भेटी लागे चाफा
आज, उद्या करता करता,
शेवटी भेटण्याचा मुहूर्त ठरला,
आणि आळस मागे झटकून,
अखेर तूच पुढाकार घेतलास.
रात्री लवकर झोपणारा मी,
काल मात्र डोळा लागलाच नाही;
पहाट उजाडेपर्यंतही,
बेचैन मनाला काही सुचलंच नाही.
भेटायची ती ओढ इतकी, कसा-बसा तयार झालो,
पण एवढ्या दिवसांनी भेटतोय आपण,
रिकाम्या हाती कसा जाणार?
म्हणून या विचारांत गुंग झालो.
तोच विचार करत बाहेर पडलो.
तेवढ्यात स्टेशनजवळ एक फुलवाला भेटला;
गुलाब, मोगरा आणि ट्युलिपच्या गर्दीत,
तो शेवटचा उरलेला चाफा मनात भरला.
लोकलच्या गर्दीत,
चाफा सांभाळून नेण्याचं धाडस मी करत होतो.
त्याला अलगद हृदयाजवळ जपून,
एक-एक क्षण मोजत होतो.
भेटण्याचा तो क्षण आता जवळ आला होता.
प्लॅटफॉर्मवर उतरलो आणि तुला पाहिलं;
क्षणभर थांबलो, श्वास धडधडला,
पुन्हा तुझ्या प्रेमात पडायच्या आधी, चाफा तुझ्या हाती दिला.
नंतर चहा झाला, गप्पा झाल्या;
मळलेल्या आठवणींना जरा उजाळा आला.
पण घड्याळाच्या काट्यांना सांगता आलं नाही,
कधी उजाडलेल्या दिवसाचा अंधार झाला.
"चला, निघायचं आता," असं म्हणालीस,
निरोपाच्या त्या क्षणी नजरा मिळाल्या,
चाफा मात्र जपून घेतलास;
असो, त्याला तरी तुझा सहवास मिळाला.
Comments
Post a Comment