डोंगर

डोंगर 


पक्के अनुभव असलेला काळाकुट्ट डोंगर 
आसमंत व्यापून टाकलेला असतो त्याने 
कधी भासते प्रखर भीती त्याची 
प्रचितीचा पाऊस सोसलेला असतो त्याने 

घणकंपाने एका कोसळते दरड आयुष्यावर 
क्रोध जेव्हा त्याचा अनावर होतो 
त्याच्या डोळ्यांमधलं भयकारी लक्ष एकदाच पाहून 
रागामध्ये चिरडून टाकलं तर, याचा भास होतो 

प्रहार बघून त्याचा वसुंधराही होते काहील 
वाटत असतं तिला एकदा घडावा संवाद आनंदाचा 
पण दगडात नसतो जोर डोळ्याला डोळे भिडवून 
आणि मान वर करून डोंगर पाहण्याचा



तापट डोंगर आता हळूहळू होतो म्हातारा
वाढत्या वयानुसार निवळायला लागतं त्याला
वृद्ध डोंगराकडे पुन्हा नजर जाते जेव्हा
दयावा लागतो आधार दगडाला त्याला

ऋण फेडत असलेला दगड पाहतांना
डोंगराचा जीव उगाच दाटून येतो
मग मोठा झालेला दगड आपलं वय विसरुन
निरभ्र शांत डोंगराला कवेत घेतो

वसुंधरेचा ही आटापिटा आता मात्र विझावतो
ओथंबलेले क्षण जागे होतात
आणि असंच घराघरात हे चालू असतं
दगडाचा डोंगर होतो अन डोंगराचे दगड होतात

- शुभम आव्हाड 

Comments

Post a Comment