माझी आजी

माझी आजी 


गावी जाण्याची वारी मी नेहमी चुकवतो 
टिव्ही नाही तिथं म्हणून मी घाबरतो 
पण तिचं नाव ऐकल्यावर वेगळाच उत्साह चढतो 
तक्षणी गाडीत बसून आजोळ जायला निघतो 

अजूनही ती प्रेम करते आहे, जीव लावते आहे 
तिला सगळ्यांचीच काळजी 
कारण, ती आहे माझी आजी 

चुलीवरची भाकर तिची सोबत लोणच्याची फोड 
तेव्हा मात्र त्या चवीला नसते कसलीही तोड 
अंथरुण पडल्यावर असतो भर तिच्या गोष्टींवर 
ऐकायला मज्जा येते हळूच डोकं ठेऊन तिच्या मांडीवर 

अजूनही ती प्रेम करते आहे, जीव लावते आहे 
तिला सगळ्यांचीच काळजी 
कारण, ती आहे माझी आजी



भेटायला येतांना रिकाम्या हाती कधीच येत नाही ती 
माझ्या आवडीची गुडीशेव आणायला विसरत नाही ती 
ती आल्यावर आमचं चौघांच कुटुंब भरून निघतं 
मग काय गावरण चवीचं जेवण रोज खायला मिळतं 

अजूनही ती प्रेम करते आहे, जीव लावते आहे 
तिला सगळ्यांचीच काळजी 
कारण, ती आहे माझी आजी

राग आल्यावर तिचा पारा आयफेल टॉवर एवढा चढतो 
आणि तेव्हा मग शिव्यांचा धो-धो पाऊस पडतो 
"वय झालंय रे तिचं आता" असं अचानक डोक्यात येतं 
पण माझं अल्लड मन हे स्विकारायला तयारचं नसतं 

अजूनही ती प्रेम करते आहे, जीव लावते आहे 
तिला सगळ्यांचीच काळजी 
कारण, ती आहे माझी आजी

प्रत्येकाच्या जीवनात पाहिजेचं "आजी" या नावाचा सार
 अवघ्या घराला नकळत भासतो या माऊलीचा आधार 
परिवार आणि नातवंड आहेत तिला अनेक 
पण आमच्या साठी आहे ती एकूलती एक 

अजूनही ती प्रेम करते आहे, जीव लावते आहे 
तिला सगळ्यांचीच काळजी 
कारण, ती आहे माझी आजी

- शुभम आव्हाड 



Comments